मुंबई –
भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे जगभरात संतापाची लाट उसळली आहे. या वक्तव्याप्रकरणी भारत सरकारने जगभरातील मुस्लिम समाजाची माफी मागावी या मागणीसाठी हॅकर्सनी ठाणे पोलिसांची वेबसाईट हॅक केली आहे. दरम्यान अल-कायदा या दहशतवादी संघटनेनंही भारतातील वेगवेगळ्या शहरांवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे.
आता देशातील वेगवेगळ्या सरकारी आणि खासगी वेबसाईट्सवर याच मुद्द्यावरुन सायबर हल्ले होताना दिसतायत. याचा सर्वात मोठा फटका महाराष्ट्राला बसला असून राज्यातील 50 वेबसाईट्स हॅक झाल्यात. या हॅकर्सने जगभरातील मुस्लीम हॅकर्सला भारतीय वेबसाईटवर सायबर हल्ले करण्यासाठी आवाहनही केलं आहे. याच पार्श्वभूमीवर आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काहींचा समाजात तेढ पसरवण्याचा प्रयत्न सुरु असून या प्रकरणातील कारवाईबाबत पंतप्रधानांनी निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे. आज ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले की, “अनेक वेबसाईट हॅक करण्यात आल्या ही वस्तुस्थिती आहे. एडीजी मधुकर पांडे पुढील तपास करत आहे. ठाणे पोलीस कमिशनची वेबसाईट हॅक झाली आहे, परंतु कोणताही महत्त्वाची माहिती लीक झालेली नाही. कोणत्याही कारणावरून समाज- समाजात एक प्रकारे तेढ निर्माण करण्याचे जे काम सुरु आहे त्याचे हे परिणाम आहेत. हॅकर्सनी जगभरातील सर्व हॅकर्सना विनंती केली आहे की, तुम्हीही यात सहभागी व्हा. राज्य सरकारच्या वतीने या सर्व गोष्टींचा आढावा घेण्यात आला आहे. त्यावर काय उपाय योजना करायच्या आहेत त्यासंदर्भातही यंत्रणा कार्यरत आहेत. तथापी सर्व माहिती अद्याप प्राप्त झाली नसल्याने त्यामध्ये अधिक माहिती देण्यासाठी माझ्याकडे आता नाही.”
“हॅकर्सची जी मागणी आहे की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या संदर्भात माफी मागितली पाहिजे. ज्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी जे प्रेषित पैगंबर मोहम्मदांबद्दल उद्गार काढले त्याबद्दल अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत कारवाई सुरु आहे. त्याबाबत काय निर्णय घ्यायचा याबाबत पंतप्रधानांनी स्वत: ठरवले पाहिजे,” अशी मागणीही गृहमंत्र्यांनी केली आहे.
“ही घटना दुर्दैवी आहे. कारण आपल्या देशात समाजा-समाजात द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे, त्याला प्रतिकार म्हणून प्रतिहल्ला म्हणून अशाप्रकारची कृती समाजातल्या टोकाच्या विचार करणाऱ्या लोकांकडून होत आहे. ही बाब बरोबर नाही कारण शेवटी सगळ्यांना सलोख्याने राहायचे असेल तर अडचणी भावना समजून घेणे गरजेचे आहे. हॅकर्सकडून जे अपील केले जात आहे ज्यामुळे नुकसान सर्वांचे होणार आहे. त्यामुळे अशा गोष्टींपासून सर्वांनी दूर रहावं” अशी विनंती गृहमंत्र्यांनी केली आहे.
पिंपरी –
जागतिक स्तरावर रक्तदानाला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी १४ जून रोजी जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो. या विशेष दिवसाचा उद्देश जगभरात रक्तदानाला प्रोत्साहन देण्यासाठी लोकांना प्रेरणा देणे हा आहे. एका अंदाजानुसार, जगभरात दरवर्षी अंदाजे ११८.५ दशलक्ष रक्तदान गोळा केले जाते. रक्तदान हे सर्वात महत्वाचे दान मानले जाते कारण ते एखाद्या व्यक्तीचे जीवन वाचवू शकते. दुखापत, ऑपरेशन किंवा कोणत्याही गंभीर आजाराच्या उपचारादरम्यान रुग्णाला बाहेरून रक्ताची गरज भासू शकते, अशा वेळी रक्तदानातून गोळा केलेले रक्त वापरले जाते.
रक्तदान हे केवळ प्राप्तकर्त्यासाठीच नव्हे तर रक्तदात्यासाठीही फायदेशीर मानले जाते. अभ्यास दर्शविते की जे लोक नियमितपणे रक्तदान करतात त्यांना हेमोक्रोमॅटोसिसचा धोका कमी होतो. शरीरात जास्त प्रमाणात आयर्न झाल्यामुळे ही समस्या उद्भवते. याशिवाय जे लोक रक्तदान करत राहतात त्यांच्या शरीरात नवीन रक्तपेशींच्या निर्मितीतही वाढ होते. रक्तदान केल्याने कर्करोग, हृदय आणि यकृताशी संबंधित आरोग्य धोके देखील कमी होतात. मात्र रक्तदान करण्यापूर्वी आणि नंतर अन्न आणि आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. चला, आज जागतिक रक्तदाता दिनानिमित्त याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.
रक्तदान कोण करू शकतो?
१८ वर्षे किंवा त्याहून अधिक आणि ६० वर्षांपेक्षा कमी वयाच्या निरोगी व्यक्ती स्वेच्छेने रक्तदान करू शकतात. रक्तदात्याचे वजन किमान ५० किलो असावे आणि तो मधुमेह किंवा रक्तदाब यांसारख्या समस्यांचा रुग्ण नसावा. एकदा दान केल्यानंतर ५६ दिवसांनी दुसरे दान करता येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रक्तदान केल्याने ना अशक्तपणा येत नाही आणि आरोग्यालाही हानी पोहोचत नाही. होय, रक्तदान करण्यापूर्वी आणि नंतर आहार घेण्याबाबत काळजी घेणे योग्य आहे.
रक्तदान करण्यापूर्वी महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या
. रक्तदान करण्यापूर्वी हलका पण सकस आहार घ्या आणि भरपूर पाणी प्या. हे तुमच्या शारीरिक कार्यांवर नियंत्रण ठेवण्यास आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करेल.
. रिकाम्या पोटी कधीही रक्तदान करू नका. रक्तदान केल्याने तुमच्या शरीरातील लोहाची पातळी थोडी कमी होऊ शकते, त्यामुळे आरोग्यदायी आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन केल्यानंतरच रक्तदान करा. मात्र, रक्तदान केल्यानंतर शरीरातील लोहाची कमतरताही आपोआप भरून निघते.
. रक्तदान करण्यापूर्वी जास्त चरबीयुक्त पदार्थ, धूम्रपान किंवा मद्यपान टाळा.
. रक्तदान केल्यानंतर ज्यूस-पेयांचे सेवन करा
रक्तदान केल्यानंतर काय करावे?
. रक्तदान केल्यानंतर काही काळ तुम्हाला थोडासा अशक्तपणा जाणवू शकतो, मात्र ते लवकरच साधारण होते.
आरोग्य तज्ज्ञ सांगतात, रक्तदान पूर्णपणे सुरक्षित आहे, अजिबात घाबरू नये. रक्तदान केल्यानंतर, तुम्हाला समाधान वाटते जे मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. रक्तदान केल्याने शरीरात रक्ताची कमतरता भासणार नाही, अशा पद्धतीने शरीरात रक्त निर्मितीची प्रक्रिया सतत चालू राहते. त्यामुळंच तज्ज्ञ रक्तदान ही पूर्णपणे आरोग्यदायी प्रक्रिया मानतात.
नवी दिल्ली –
प्रेषित मोहम्मद यांच्यावर कथित वक्तव्य केल्याप्रकरणी नुपूर शर्मा यांचा निषेध दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (10 जून) देशभरात अनेक ठिकाणी हिंसक निदर्शने झाली. त्याच वेळी, शनिवारी म्हणजेच 11 जून रोजी आंदोलन सुरूच आहे. तथापि, पैगंबर मोहम्मद इत्यादींवरील विधानावरून वादांची मालिका सुरू होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी प्रेषित मोहम्मद यांच्यामुळे अनेक चित्रपटही चर्चेत आले होते आणि त्यांच्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. पैगंबर मोहम्मद यांच्यावर बनलेले चित्रपट आणि त्यांच्याशी संबंधित वादांबद्दल जाणून घेऊया…
‘द लेडी ऑफ हेवन’
नुकतीच प्रदर्शित झालेली यूकेची सर्वात मोठी मुव्ही ‘द लेडी ऑफ हेवन’ सतत वादात राहिली. चित्रपटाच्या विरोधामुळे अनेक ठिकाणी या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. या चित्रपटाला विरोध करणाऱ्यांचा असा विश्वास आहे की या चित्रपटात सुरुवातीच्या इस्लामिक इतिहासाचे चुकीचे चित्रण करण्यात आले आहे. तसेच या चित्रपटात पैगंबर मोहम्मद यांचा अनेक प्रकारे अपमान केल्याचा दावा केला जात आहे. हा चित्रपट सातव्या शतकातील पैगंबर मोहम्मद यांची मुलगी फातिमा हिच्या जीवनावर आधारित आहे.
‘मोहम्मद: मेसेंजर ऑफ गॉड’
प्रेषित मुहम्मद यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘मोहम्मद: मेसेंजर ऑफ गॉड’ या विषयावरही जगभरात बरेच वाद झाले आहेत. 2015 मध्ये आलेल्या या चित्रपटाला बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार ए आर रहमान यांचे संगीत होते. मात्र, या चित्रपटाच्या वादामुळे रहमानच्या विरोधात फतवाही काढण्यात आला होता. खरंतर या चित्रपटात पैगंबरांच्या बालपणीची गोष्ट आहे, पण त्यात अभिनेत्याचा चेहरा न दाखवता फक्त सावली दाखवण्यात आली आहे. यामुळे इस्लामिक संघटना नाराज झाल्या. ते म्हणाले की, शरिया प्रेषितांना वास्तव म्हणून दाखवण्याची कल्पना करण्यास मनाई करते. इस्लाम याला परवानगी देत नाही. त्याचवेळी पैगंबरांची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याने अन्य कोणत्यातरी चित्रपटातही नकारात्मक भूमिका केल्याचा संतापही संघटनांनी व्यक्त केला होता. अशा परिस्थितीत या अभिनेत्याने पैगंबराची भूमिका साकारणे हा त्यांचा अपमान आहे, या भावनेतून या चित्रपटाला विरोध झाला.
‘इनोसन्स ऑफ मुस्लिम्स’
‘इनोसन्स ऑफ मुस्लिम्स’ हा पैगंबर मोहम्मद यांच्यावर बनवण्यात आलेला आणखी एक चित्रपट आहे, जो रिलीज करतानाच अनेक वादात सापडला. 2012 साली आलेल्या या चित्रपटाला जगभरातून विरोध झाला होता. वास्तविक, या चित्रपटात पैगंबरांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
मुंबई –
शाओमी (Xiaomi) ने गेल्या वर्षी Mi 11X सीरीज भारतात लॉन्च केली होती. या मालिकेअंतर्गत Mi 11X आणि 11X Pro स्मार्टफोन लॉन्च करण्यात आले होते. या दोन्ही फोनमध्ये प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत. यापैकी, Xiaomi Mi 11X Pro ची सुरुवातीची किंमत 39,999 रुपये आहे आणि सध्या या फोनवर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट मिळत आहे. तुम्ही आता Mi 11X Pro चक्क 11,000 रुपयांपर्यंतच्या सूटसह खरेदी करू शकता. चला, जाणून घेऊ या ऑफरबद्दल.
Mi 11X च्या 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेजची किंमत 29,999 रुपये आहे आणि 8 GB रॅम सह 128 GB स्टोरेजची किंमत 31,999 रुपये आहे. Mi 11X Pro चा 8 GB RAM सह 128 GB व्हेरिएंट 39,990 रुपयांच्या किमतीत लॉन्च करण्यात आला होता आणि 8 GB रॅम सह 256 GB मॉडेल 41,999 रुपये किमतीत लॉन्च करण्यात आला होता परंतु आता Amazon India कडून Xiaomi Mi 11X Pro केवळ 29,999 रुपये किमतीत खरेदी करता येईल. तुमच्याकडे SBI बँकेचे कार्ड असल्यास तुम्हाला अतिरिक्त 1,000 रुपयांची सूट मिळेल. Mi 11X Pro सेलेस्टियल सिल्व्हर, कॉस्मिक ब्लॅक आणि फ्रॉस्टी व्हाईटमध्ये उपलब्ध असेल. फोन कंपनीच्या वेबसाइटवर जुन्या किंमतीसह लिस्ट केलेला आहे. नवीन किंमतीसह हा फोन Amazon वर पाहता येईल.
Mi 11X Pro चे स्पेसिफिकेशन
Mi 11X Pro मध्ये Android 11 आधारित MIUI 12 देखील देण्यात आला आहे. फोनमध्ये 1080×2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.67-इंचाचा फुल HD + E4 AMOLED डिस्प्ले आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश दर 120Hz आहे आणि टच सॅम्पलिंग दर 360Hz आहे. फोनच्या डिस्प्लेची ब्राइटनेस 1,300 nits आहे. फोनच्या डिस्प्लेवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस सपोर्ट आहे. फोनमध्ये HDR10+ साठी सपोर्ट आहे. Mi 11X Pro मध्ये Snapdragon 888 प्रोसेसर, ग्राफिक्ससाठी Adreno 660 GPU, 8 GB RAM आणि 256 GB स्टोरेज आहे.
Mi 11X Pro कॅमेरा
फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. Mi 11X Pro मधील प्रायमरी लेन्स 108 मेगापिक्सेल आहे, तर दुसरी लेन्स 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड आहे. त्याच वेळी, तिसरी लेन्स 5-मेगापिक्सेल मॅक्रो आहे. 108-मेगापिक्सेल लेन्स सॅमसंग एचएम2 सेन्सर आहे. फोनमध्ये सेल्फीसाठी 20-मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेरासह ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन देखील उपलब्ध असेल.
Mi 11X Pro बॅटरी
कनेक्टिव्हिटीसाठी, फोनमध्ये 5G, ड्युअल बँड Wi-Fi, Wi-Fi 6, GPS, AGPS, NavIC सपोर्ट आणि USB Type-C पोर्ट आहे. Mi 11X Pro मध्ये Bluetooth v5.2 आणि Wi-Fi 6e आहे. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. Mi 11X Pro मध्ये 4520mAh बॅटरी आहे जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये Dolby Atmos सपोर्टसह ड्युअल स्पीकर आहेत.
हडपसर –
मृत्यू कधी कुठे कसा गाठेल याचा नेम नाही. मैदानावर क्रिकेट खेळत असताना असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मैदानावर क्रिकेटचा सामना सुरू असताना खेळाडूचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे मैदानावर खळबळ उडाली होती.
हांडेवाडी येथील मैदानावर क्रिकेट खेळताना तरुणाचा दम लागून रविवारी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. श्रीतेज सचिन घुले (वय २२, रा. उंड्री, ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सकाळी सात वाजता तो मित्रांसोबत क्रिकेट खेळायला हांडेवाडी येथील मैदानावर गेला होता. दम लागल्याने तो खाली कोसळला. मित्रांनी त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
श्रीतेजच्या आकस्मिक निधनाची माहिती कळताच परिसरात शोककळा पसरली. श्रीतेज हा हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती सचिन घुले व उंड्री गावच्या माजी सरपंच श्वेता घुले यांचा मुलगा होता. श्रीतेजला मोठा मित्र परिवार होता. त्याच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या पूर्वीही 17 फेब्रुवारीला अशीच एक घटना घडली होती. महेश उर्फ बाबू नलावडे याचा क्रिकेट खेळताना मैदानावरच मृत्यू झाला आहे. मैदानावरच हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. तो 45 वर्षांचा होता. पुणे जिल्ह्यातील बोरी बुद्रुक येथील जाधववाडी गावात स्वर्गीय मयूर चषक क्रिकेट स्पर्धा सुरु होती. या वेळी ओझर संघ आणि जांबुत संघ यांच्यात क्रिकेट सामना सुरु असताना 17 फेब्रुवारी या दिवशी ही घटना घडली. या सामन्यात बाबू नलावडे हा फलंदाजी करत होता. नॉन स्ट्राईकला असताना अचानक तो खाली बसला आणि त्याच ठिकाणी त्याचा मृत्यू झाला.
सामना सुरु असताना अचानक घडलेल्या या प्रकाराणे मैदानावरील खेळाडू आणि पंचांनाही धक्का बसला. मैदानावरील खेळाडू आणि स्पर्धेच्या आयोजकांनी त्याला नारायणगाव येथील डॉ. राऊत यांच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु, तत्पूर्वीच बाबू नलावडे यांचा मृत्यू झाला होता.
पिंपरी –
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनी श्रेया वाळुंजकर आणि ऋतुजा जोशी या दोघींची “आशिया काकेहाशी शिष्यवृत्ती २०२२” साठी निवड झाली आहे. १५ जूनला या दोघी जापान साठी रवाना होणार आहेत.
त्यांना शुभेच्छा देताना पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे म्हणाले की, भारतीय विद्यार्थ्यांना योग्य संधी आणि प्रोत्साहन दिले तर ते विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःला सिद्ध करतात. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या सर्वच शाखांमध्ये विद्यार्थ्यांना नेहमीच राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील आधुनिक व उच्च दर्जाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न असतो. शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांना देखील आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिष्यवृत्तीच्या संधी मिळाव्यात यासाठी एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये विविध प्रकल्प राबवले जातात. त्या अंतर्गत जपान सरकारच्या शिष्यवृत्ती योजना देखील राबविण्यात येतात. या शाळेत विद्यार्थ्यांना नेहमीच जगभरातील विविध भाषा शिकण्याचे प्रोत्साहन दिले जाते. जेणेकरून जागतिक स्तरावर पूर्ण आत्मविश्वासाने ही भावी पिढी भारतीय संस्कृती आणि बुद्धिमत्ता सिद्ध करून अतुलनीय कामगिरी करेल असा विश्वास पीसीईटीच्या विश्वस्तांना आहे.
या वेळी एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका डॉ. बिंदू सैनी यांनी सांगितले की, आशिया काकेहाशीच्या एएफएस इंडिया शिष्यवृत्ती साठी आशियाई देशांमधून विद्यार्थ्यांची निवड केली जाते. या शिष्यवृत्तीच्या अंतर्गत आशियाई देशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणे हा उद्देश आहे. श्रेया वाळुंजकर ही विद्यार्थिनी एस. बी. पाटील मध्ये जापानी भाषा शिकली. भाषा शिकण्याची आवड असल्यामुळे शालेय शिक्षणानंतर तीने साकुरा जापनीज या क्लास तर्फे जापानी भाषा शिकणे सुरूच ठेवले. ऋतुजा जोशी या विद्यार्थिनीने देखील जपानी भाषा शिकण्यास वर्षभर तयारी केली श्रेया आणि ऋतुजा या दोघींना भरतनाट्यम हा नृत्यप्रकार करण्याची आवड आहे. जपान आणि इतर आशियाई देशांमधील किशोरवयीन मुलांमध्ये आंतरसांस्कृतिक देवाणघेवाण करणे केंद्रित आहे. भारतातून जापानमध्ये युवा प्रतिनिधी म्हणून आवश्यक असलेले वैयक्तिक आणि शैक्षणिक गुण पहिले जातात. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना जपान सरकारद्वारे १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत रहिवासी शिक्षणाची संधी दिली जाते.
श्रेया आणि ऋतुजा यांचा शाळेतर्फे पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, खजिनदार शांताराम गराडे, सचिव विठ्ठल काळभोर, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, मुख्याध्यापिका डॉ. बिंदू सैनी व उपमुख्याध्यापिका पद्मावती बंडा यांनी सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पिंपरी –
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देहू येथे उद्या (14 जून) येत आहेत. संत तुकाराम महाराज शिळा मंदिर उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यांच्या या दौऱ्याला चक्क भाजप युवा मोर्चाचा विरोध असल्याचं समजतंय. पिंपरी-चिंचवड शहर भाजप युवा जनताचे उपाध्यक्ष सचिन काळभोर यांनी मोदींच्या कार्यक्रमाला विरोध दर्शवला आहे. त्यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे.
सचिन काळभोर यांच्या विरोधाबाबत त्यांनी सांगितले की, रेड झोन एरिया कमी करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू असून, आंदोलन व मोर्चे काढण्यात आले आहेत. देहू गाव, देहरोड, चिखली, तळवडे, मोशी, दिघी, निगडी, बोपखेल ह्या गावातील सर्व जमीन रेड झोन क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली आहे. संरक्षण क्षेत्रातील बाधित जागा म्हणून पुणे जिल्हाधिकारी यांनी जाहीर केली आहे. त्यामुळे बांधकाम परवाना मिळत नाही तसेच इतर मुलभूत सुविधा उपलब्ध होत नाहीत. गटारं, रस्ता, पाणी, लाईट इत्यादी सुविधा नागरिकांना उपलब्ध होत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेड झोन एरिया क्षेत्र कमी करून स्थानिक भूमी पुत्र यांना न्याय मिळवून द्यावा. त्यानंतरच संत तुकाराम महाराज शिळा मंदिर उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहावे अशी मागणी सचिन काळभोर यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमची मागणी मान्य न केल्यास त्यांच्या दौऱ्याच्या वेळेस रास्ता रोको करण्यात येईल तसेच काळे झेंडेही दाखवण्यात येणार आहेत असे सचिन काळभोर यांनी सांगितले.
आता सचिन काळभोर यांची भाजपा नेते समजूत काढणार की त्यांचे आदोलन मोडून काढणार हे पाहावे लागेल.
पुण्यातील भवानी पेठ परिसरात विशाल सोसायटीमधील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या एका फ्लॅटमध्ये नुकताच स्फोट झाला होता. या प्रकरणी एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. या घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांसह बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र हा स्फोट नेमका कशामुळे झाला, याबाबतचे गूढ वाढले आहे.
स्फोटाच्या आवाजामुळे फ्लॅटच्या खिडक्या देखील फुटल्या. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव रशाद मोहम्मद अली शेख असं आहे. रशादकडे चौकशी केल्यानंतर तो कोंढवा परिसरामध्ये आपल्या नातेवाईकांसोबत लिशा इनकलेव या सोसायटीमध्ये राहत असल्याचं कळाल्यानंतर पुणे पोलीस तिथेही पोहोचले आणि आणि त्यांनी त्याच्या नातेवाईकांची देखील चौकशी केली.
भवानी पेठेतील या स्फोटमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु, शेख या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी सुरू आहे. त्याच्याकडे अनेक सिमकार्ड आणि पासपोर्ट आढळलेले आहेत. अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. तो या पासपोर्टचा वापर करून अनेक देशात गेले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा स्फोट कशाचा झाला याचा तपास सुरू आहे. हा स्फोट नेमका वॉशिंग मशीनचा आहे की नाही याचा तपास पोलिस करत आहेत.
दरम्यान ज्या फ्लॅटमध्ये स्फोट झाला तेथून काही सिमकार्ड, पाकिस्तानी पुस्तकांसह संशयास्पद वस्तू जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र पुणे पोलीस अजूनही काही बोलायला तयार नसल्यानं या प्रकरणाचं गूढ अधिक वाढत चाललं आहे.
रशाद मोहम्मद अली शेख असे या फ्लॅटधारकाचे नाव असून तो वॉशिंग मशीन, ओव्हन रीपेअरींगची कामे करतो. प्राथमिक माहितीनुसार हा स्फोट वॉशिंग मशीन रिपेअर करताना झाल्याचं समोर आलं होतं. शेख हा गेल्या 10 वर्षांपासून या सोसायटीत वास्तव्यास असल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष मुस्ताक अहमद यांनी दिली. राशद हा मुळचा मुंबईतला आहे. तो इलेक्ट्रिक इंजिनिअर आहे. मात्र तो गेल्या 10 वर्षांपासून याच फ्लॅटमध्ये राहतो आहे.