हडपसर –
मृत्यू कधी कुठे कसा गाठेल याचा नेम नाही. मैदानावर क्रिकेट खेळत असताना असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मैदानावर क्रिकेटचा सामना सुरू असताना खेळाडूचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे मैदानावर खळबळ उडाली होती.
हांडेवाडी येथील मैदानावर क्रिकेट खेळताना तरुणाचा दम लागून रविवारी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. श्रीतेज सचिन घुले (वय २२, रा. उंड्री, ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सकाळी सात वाजता तो मित्रांसोबत क्रिकेट खेळायला हांडेवाडी येथील मैदानावर गेला होता. दम लागल्याने तो खाली कोसळला. मित्रांनी त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
श्रीतेजच्या आकस्मिक निधनाची माहिती कळताच परिसरात शोककळा पसरली. श्रीतेज हा हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती सचिन घुले व उंड्री गावच्या माजी सरपंच श्वेता घुले यांचा मुलगा होता. श्रीतेजला मोठा मित्र परिवार होता. त्याच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या पूर्वीही 17 फेब्रुवारीला अशीच एक घटना घडली होती. महेश उर्फ बाबू नलावडे याचा क्रिकेट खेळताना मैदानावरच मृत्यू झाला आहे. मैदानावरच हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. तो 45 वर्षांचा होता. पुणे जिल्ह्यातील बोरी बुद्रुक येथील जाधववाडी गावात स्वर्गीय मयूर चषक क्रिकेट स्पर्धा सुरु होती. या वेळी ओझर संघ आणि जांबुत संघ यांच्यात क्रिकेट सामना सुरु असताना 17 फेब्रुवारी या दिवशी ही घटना घडली. या सामन्यात बाबू नलावडे हा फलंदाजी करत होता. नॉन स्ट्राईकला असताना अचानक तो खाली बसला आणि त्याच ठिकाणी त्याचा मृत्यू झाला.
सामना सुरु असताना अचानक घडलेल्या या प्रकाराणे मैदानावरील खेळाडू आणि पंचांनाही धक्का बसला. मैदानावरील खेळाडू आणि स्पर्धेच्या आयोजकांनी त्याला नारायणगाव येथील डॉ. राऊत यांच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु, तत्पूर्वीच बाबू नलावडे यांचा मृत्यू झाला होता.
पिंपरी –
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनी श्रेया वाळुंजकर आणि ऋतुजा जोशी या दोघींची “आशिया काकेहाशी शिष्यवृत्ती २०२२” साठी निवड झाली आहे. १५ जूनला या दोघी जापान साठी रवाना होणार आहेत.
त्यांना शुभेच्छा देताना पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे म्हणाले की, भारतीय विद्यार्थ्यांना योग्य संधी आणि प्रोत्साहन दिले तर ते विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःला सिद्ध करतात. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या सर्वच शाखांमध्ये विद्यार्थ्यांना नेहमीच राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील आधुनिक व उच्च दर्जाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न असतो. शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांना देखील आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिष्यवृत्तीच्या संधी मिळाव्यात यासाठी एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये विविध प्रकल्प राबवले जातात. त्या अंतर्गत जपान सरकारच्या शिष्यवृत्ती योजना देखील राबविण्यात येतात. या शाळेत विद्यार्थ्यांना नेहमीच जगभरातील विविध भाषा शिकण्याचे प्रोत्साहन दिले जाते. जेणेकरून जागतिक स्तरावर पूर्ण आत्मविश्वासाने ही भावी पिढी भारतीय संस्कृती आणि बुद्धिमत्ता सिद्ध करून अतुलनीय कामगिरी करेल असा विश्वास पीसीईटीच्या विश्वस्तांना आहे.
या वेळी एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका डॉ. बिंदू सैनी यांनी सांगितले की, आशिया काकेहाशीच्या एएफएस इंडिया शिष्यवृत्ती साठी आशियाई देशांमधून विद्यार्थ्यांची निवड केली जाते. या शिष्यवृत्तीच्या अंतर्गत आशियाई देशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणे हा उद्देश आहे. श्रेया वाळुंजकर ही विद्यार्थिनी एस. बी. पाटील मध्ये जापानी भाषा शिकली. भाषा शिकण्याची आवड असल्यामुळे शालेय शिक्षणानंतर तीने साकुरा जापनीज या क्लास तर्फे जापानी भाषा शिकणे सुरूच ठेवले. ऋतुजा जोशी या विद्यार्थिनीने देखील जपानी भाषा शिकण्यास वर्षभर तयारी केली श्रेया आणि ऋतुजा या दोघींना भरतनाट्यम हा नृत्यप्रकार करण्याची आवड आहे. जपान आणि इतर आशियाई देशांमधील किशोरवयीन मुलांमध्ये आंतरसांस्कृतिक देवाणघेवाण करणे केंद्रित आहे. भारतातून जापानमध्ये युवा प्रतिनिधी म्हणून आवश्यक असलेले वैयक्तिक आणि शैक्षणिक गुण पहिले जातात. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना जपान सरकारद्वारे १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत रहिवासी शिक्षणाची संधी दिली जाते.
श्रेया आणि ऋतुजा यांचा शाळेतर्फे पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, खजिनदार शांताराम गराडे, सचिव विठ्ठल काळभोर, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, मुख्याध्यापिका डॉ. बिंदू सैनी व उपमुख्याध्यापिका पद्मावती बंडा यांनी सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पिंपरी –
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देहू येथे उद्या (14 जून) येत आहेत. संत तुकाराम महाराज शिळा मंदिर उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यांच्या या दौऱ्याला चक्क भाजप युवा मोर्चाचा विरोध असल्याचं समजतंय. पिंपरी-चिंचवड शहर भाजप युवा जनताचे उपाध्यक्ष सचिन काळभोर यांनी मोदींच्या कार्यक्रमाला विरोध दर्शवला आहे. त्यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे.
सचिन काळभोर यांच्या विरोधाबाबत त्यांनी सांगितले की, रेड झोन एरिया कमी करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू असून, आंदोलन व मोर्चे काढण्यात आले आहेत. देहू गाव, देहरोड, चिखली, तळवडे, मोशी, दिघी, निगडी, बोपखेल ह्या गावातील सर्व जमीन रेड झोन क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली आहे. संरक्षण क्षेत्रातील बाधित जागा म्हणून पुणे जिल्हाधिकारी यांनी जाहीर केली आहे. त्यामुळे बांधकाम परवाना मिळत नाही तसेच इतर मुलभूत सुविधा उपलब्ध होत नाहीत. गटारं, रस्ता, पाणी, लाईट इत्यादी सुविधा नागरिकांना उपलब्ध होत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेड झोन एरिया क्षेत्र कमी करून स्थानिक भूमी पुत्र यांना न्याय मिळवून द्यावा. त्यानंतरच संत तुकाराम महाराज शिळा मंदिर उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहावे अशी मागणी सचिन काळभोर यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमची मागणी मान्य न केल्यास त्यांच्या दौऱ्याच्या वेळेस रास्ता रोको करण्यात येईल तसेच काळे झेंडेही दाखवण्यात येणार आहेत असे सचिन काळभोर यांनी सांगितले.
आता सचिन काळभोर यांची भाजपा नेते समजूत काढणार की त्यांचे आदोलन मोडून काढणार हे पाहावे लागेल.
पुण्यातील भवानी पेठ परिसरात विशाल सोसायटीमधील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या एका फ्लॅटमध्ये नुकताच स्फोट झाला होता. या प्रकरणी एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. या घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांसह बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र हा स्फोट नेमका कशामुळे झाला, याबाबतचे गूढ वाढले आहे.
स्फोटाच्या आवाजामुळे फ्लॅटच्या खिडक्या देखील फुटल्या. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव रशाद मोहम्मद अली शेख असं आहे. रशादकडे चौकशी केल्यानंतर तो कोंढवा परिसरामध्ये आपल्या नातेवाईकांसोबत लिशा इनकलेव या सोसायटीमध्ये राहत असल्याचं कळाल्यानंतर पुणे पोलीस तिथेही पोहोचले आणि आणि त्यांनी त्याच्या नातेवाईकांची देखील चौकशी केली.
भवानी पेठेतील या स्फोटमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु, शेख या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी सुरू आहे. त्याच्याकडे अनेक सिमकार्ड आणि पासपोर्ट आढळलेले आहेत. अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. तो या पासपोर्टचा वापर करून अनेक देशात गेले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा स्फोट कशाचा झाला याचा तपास सुरू आहे. हा स्फोट नेमका वॉशिंग मशीनचा आहे की नाही याचा तपास पोलिस करत आहेत.
दरम्यान ज्या फ्लॅटमध्ये स्फोट झाला तेथून काही सिमकार्ड, पाकिस्तानी पुस्तकांसह संशयास्पद वस्तू जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र पुणे पोलीस अजूनही काही बोलायला तयार नसल्यानं या प्रकरणाचं गूढ अधिक वाढत चाललं आहे.
रशाद मोहम्मद अली शेख असे या फ्लॅटधारकाचे नाव असून तो वॉशिंग मशीन, ओव्हन रीपेअरींगची कामे करतो. प्राथमिक माहितीनुसार हा स्फोट वॉशिंग मशीन रिपेअर करताना झाल्याचं समोर आलं होतं. शेख हा गेल्या 10 वर्षांपासून या सोसायटीत वास्तव्यास असल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष मुस्ताक अहमद यांनी दिली. राशद हा मुळचा मुंबईतला आहे. तो इलेक्ट्रिक इंजिनिअर आहे. मात्र तो गेल्या 10 वर्षांपासून याच फ्लॅटमध्ये राहतो आहे.
पुणे –
पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. संतोष जाधव याला पुणे ग्रामीण पोलिसांनी गुजरातमधील भुज येथून तर महाकाळला मंचर येथून अटक केली. संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ कांबळे यांनी लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंध असल्याची कबुली दिली आहे. संतोष जाधवला आश्रय देणाऱ्या नवनाथ सूर्यवंशी याच्या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस महासंचालक कुलवंत सरंगल यांनी पत्रकार परिषदेत दिली. दोन्ही गुन्हेगारांना 20 जूनपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.
अतिरिक्त पोलीस महासंचालक कुलवंत सरंगल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांची २९ मे रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या खून प्रकरणात पंजाब पोलिसांच्या तपासात पुण्यातील सौरभ महाकाळ आणि संतोष जाधव यांची नावे समोर आली होती. त्या प्रकरणी पोलिसांनी सौरभ महाकाळ याला मंचर येथून अटक केली आहे.
पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या लॉरेन्स बिश्नोई टोळीशी आपले संबंध असल्याची कबुली संतोष जाधव आणि सौरभ महाकाल कांबळे यांनी दिली आहे. नवनाथ सूर्यवंशी याची संतोष जाधवला आश्रय दिल्याच्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. याप्रकरणी अधिक माहिती पुढे येईल, असे ते म्हणाले.
टक्कल करूनही संतोष जाधव पोलिसांच्या तावडीत सापडला
सिद्धू मूसेवाला खून प्रकरणातील संशयित आरोपी असलेल्या संतोष जाधव याला अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या. गुजरातच्या बीड जिल्ह्यातील मांडवी गावात तो एका मित्राच्या घरी लपून बसला होता. पोलिसांना चकवा देण्यासाठी त्याने संपूर्ण पेहराव बदलला होता. डोक्यावरचे संपूर्ण केस काढून टक्कल केले होते. मात्र पोलिसांनी त्याला अटक केलीच. त्याच्यासोबत पोलिसांनी नवनाथ सुरेश सूर्यवंशी या त्याच्या साथीदाराला ही अटक केली आहे.
पंजाबचा प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला याचा 29 मे रोजी गोळ्या घालून खून करण्यात आला होता. याप्रकरणी एकूण आठ संशयित आरोपींची यादी जारी करण्यात आली होती. त्यात पुणे जिल्ह्यातील सौरव महाकाल उर्फ सिद्धेश कांबळे आणि संतोष जाधव या दोघांचा समावेश होता. सौरव महाकाल याला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. त्यानंतर रविवारी संतोष जाधव याला देखील अटक करण्यात आली.
पुणे जिल्ह्यातील मंचर परिसरात ओमकार उर्फ राण्या बाणखेले या तरुणाचा खून झाला होता. या खून प्रकरणातील संतोष जाधव हा प्रमुख आरोपी आहे. त्याच्यावर मुक्काम नुसार कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी अटक केलेल्या सौरव महाकाल त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने संतोष जाधव हा गुजरात येथे नवनाथ सूर्यवंशी या आपल्या मित्राकडे राहत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार ग्रामीण पोलिसांनी गुजरात राज्यात जाऊन ही कारवाई केली.
भुज जिल्ह्यातील मांडवी गावात जिल्हा ग्रामीण पोलिसांचे पथक पोहोचले तेव्हा त्यांना नवनाथ सूर्यवंशी मिळाला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता त्याने माहिती देण्यास नकार दिला. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने संतोष जाधव यांच्या विषयी माहिती दिली. भूज जिल्ह्यातीलच नागोर गावात आपल्याच एका ओळखीच्या व्यक्तीकडे नवनाथने त्याला ठेवले होते. पोलीस जेव्हा त्याला अटक करण्यासाठी केली तेव्हा संतोषने संपूर्ण टक्कल करून आपला पेहराव बदलला होता, मात्र तरीही पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्याच.
– मावळ असोसिएशन ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा मेळावा
– वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन, सचिव संजय पटनी यांची माहित
पिंपरी –
‘एखादी संस्था यशस्वी कधी होते, तर जेव्हा त्यामध्ये एकी असते तेव्हा. एकीच्या बळातून संस्थेच्या यशाचा पाया रचला जातो. सुरेश मोहीते यांच्या संकल्पनेतून हा पाया रोवला गेला. त्याच भक्कम आधारावर वाटचाल करणाऱ्या या संस्थेचा प्रमुख म्हणून काम पाहताना मला विशेष समाधान वाटते’, असे मत मावळ असोसिएशन ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष अर्जुन घोळवे यांनी व्यक्त केले.
मावळ असोसिएशन ऑफ इन्फॉर्मेशन ऑफ टेक्नॉलॉजीच्या वतीने संस्थेचे ‘गेट टूगेदर’नुकतेच पार पडले. यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष बालाजी अय्यर, परेश वडके, कमल वनवारी, विजय नाईक, प्रदीप गाडे, शंकर घोलप, सुधीर पठारे, राकेश भसीन, युनायटेड पेरिफेरल्सचे सुनील गुगळे, इशा एंटरप्राईझेसचे राहुल मुथ्था, जे.एस. एंटरप्राईझेसचे मनोहर रजवाणी आदी उपस्थित होते.
अर्जुन घोळवे म्हणाले की, कॉम्पुटर्स खरेदी- विक्री क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यावसायिक, डिलर्संना संघटीत करुन त्यांच्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी मावळ असोसिएशन ऑफ इन्फोर्मोशन टेक्नॉलॉजी या संस्थेची स्थापना झाली. सुरेश मोहीते यांना हे असंघटीत लोकांसाठी लावलेले रोपटे आता वटवृक्ष झाले आहे. या वटवृक्षाच्या सावलीत आपण सर्व व्यावसायिक निश्चितपणे व्यावसायिक प्रगती करीत आहोत, यात शंका नाही. कोविड आणि लॉकडाऊनमुळे गेल्या दोन वर्षांत संस्थेच्या वतीने घेण्यात येणारे विविध उपक्रमांची परंपरा खंडित झाली. मात्र, आता कोविडचे सावट दूर झाले आहे. व्यावसायिक अडचणींवर मात करीत आपण संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम घेणार आहोत.
सचिव संजय पटनी म्हणाले की, कोविड…कोविड… अशी भीती निर्माण न करता आपण आता त्यावर मात करुन पुढे जायला शिकले पाहिजे. कोविडच्या महामारीमध्ये अनेक कटू अनुभव प्रत्येकाला आले. कौटुंबिक असेल किंवा व्यावसायिक अडचणींचा सामना करावा लागला. प्रत्येकाने संघर्षमय भूमिका ठेवून वाटचाल कायम ठेवली. या संकटातून आपण सावरलो आहोत. व्यावसायिक वाटचाल भक्कमपणे आपण निश्चितपणे यशस्वी करणार आहोत, यात शंका नाही. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आपण सर्वजण एकत्र आलो आहोत. यापुढील काळात आपण संस्थेच्या वतीने वृक्षारोपण, हेल्थ चेकअप, समाजातील गरजुंना मदत, पिकनिक ट्रीप, फॅमिली शो, एक्स्पो , टेक्निकल सेमीनार आदी उपक्रमांचे वर्षभर आयोजन केले जाणार आहे.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश मोहीते यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच, संस्थेच्या यशस्वी वाटचालीबाबत समाधानही व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन
पिंपरी –
राष्ट्रवादी काँग्रेसला आज स्थापन होऊन 22 वर्षे पुर्ण झाली आहेत. 23 व्या वर्षांत पदार्पण करत असताना आम्हाला गेल्या 22 वर्षांत पक्षाच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहरासह संपूर्ण राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी घेतलेले निर्णय, विकासाची कामे व सर्वसधर्म समभावाची जोपासना करत केलेल्या वाटचालीचा आम्हाला अभिमान आहे, असे प्रतिपादन पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केले. वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भरगच्च कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पुढे बोलताना अजित गव्हाणे म्हणाले, 1999 साली राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या दूरदृष्टीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्रातील सर्वसामान्य व्यक्तीचा विकास ही भूमिका पक्षाच्या स्थापनेपासून जोपासण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताकाळात राज्याचा विकास, नवनविन संकल्पना राबवितानाच शेतकर्यांच्या विकासाला महत्त्व दिले आहे. तर पिंपरी-चिंचवड शहराचा विकास हा केवळ राष्ट्रवादीतील नेत्यांच्या दूरदृष्टीमुळे झाला आहे. महापालिकेतील पंधरा वर्षांच्या सत्ताकाळात शहराची दैदिप्यमान वाटचाल झाली. रस्ते, उड्डाणपूल, उद्याने, स्वच्छता, पर्यावरण या बाबींना महत्त्व देतानाच सर्वसामान्य नागरिकांचे हक्काचे प्रश्न सोडविण्यात आम्हाला यश आले.
राज्यपातळीवर काम करताना पक्षाच्या माध्यमातून अनेक निर्णय घेण्यात आले. शरद पवार यांच्या नेतृत्त्वामुळे महाराष्ट्राला देशातील महत्त्वाचे विकसीत राज्य म्हणून दर्जा मिळवून देण्यात राष्ट्रवादीचाच मोठा हातभार आहे. गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयामुळे करोनावर मात करणे शक्य झाल्याचेही अजित गव्हाणे म्हणाले. एका बाजूला सरकारच्या माध्यमातून राष्ट्रवादी पक्ष नागरिकांसाठी कार्यरत असतानाही राष्ट्रवादी वलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून फेसशिल्ड, सॅनिटायझर, मास्क वाटप, पालकत्व हरपलेल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणे, सामाजिक संस्थांना अॅम्ब्युलन्स वाटप, गरजूंना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप यासारखे उपक्रम घेऊन समाजातील शेवटच्या घटकाला मदतीचा हात देण्याचा प्रयत्न पक्षाने केला.
करोना काळात मदत करताना ट्रस्टच्या माध्यमातून अतिवृष्टी, दुष्काळामुळे खचलेल्या शेतकर्यांनाही मदत करण्यात आली. तसेच होतकरू विद्यार्थ्यांना संगणक वाटपासारखे उपक्रम राबवून तरुणांना शैक्षणिकदृष्ट्या सबल करण्यात आल्याचे गव्हाणे म्हणाले.
आगामी काळात राष्ट्रवादीच्या माध्यमातून नियोजबद्ध कार्यक्रम हाती घेऊन शासनाच्या माध्यमातून जलद गतीने विकासकामे पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून अनेक उपक्रम हाती घेण्यात आले असून सर्वसामान्यांचा विकास हाच धागा पकडून राष्ट्रवादीची वाटचाल कायम राहणार असल्याचेही गव्हाणे म्हणाले.
आगामी निवडणुकांत राष्ट्रवादीला सर्वाधिक यश
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पवार यांच्याकडील दुरदृष्टी व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असलेली कामांची धउाडी याद्वारेच विकास साध्य होऊ शकतो, याची खात्री आता सर्वांना पटली आहे. येत्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीलाच सर्वाधिक यश मिळेल, असा दावाही गव्हाणे यांनी यावेळी बोलताना केला. ओबीसी आरक्षण मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध असल्याने येत्या महापालिका निवडणुका या ओबीसी आरक्षणासह होतील, याबाबत आपल्याला खात्री आहे.
महागाईवरून केंद्रावर टीका
सध्या संपूर्ण देशभर महागाईचा भडका उडाला आहे. मात्र केंद्रातील सत्ताधारी व राज्यातील विरोधी पक्षात असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून जाती-धर्मामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्वसामान्य जनतेचे लक्ष विचलीत करण्याच्या हेतून असे मुद्दे निर्माण केले जात असल्याचा आरोप गव्हाणे यांनी यावेळी केला. महागाईमुळे सर्वसामान्य जनता हवालदिल झाली असून या जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने निर्णय घ्यावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
वर्धापन दिनानिमित्त भरगच्च कार्यक्रम
राष्ट्रवादीच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त खराळवाडी येथील पक्ष कार्यालयात सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी झेंडावंदन करण्यात आले. तसेच शहरातील 46 प्रभागांमध्ये प्रत्येक घरावर झेंडा व स्टिकर लावण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, पर्यावरण विषयक जागृती, नितीन बानगुडे यांचे व्याख्यान, महिला सेलच्या माध्यमातून महिला बचत गट योजना व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आचार्य अत्रे रंगमंदिर, पिंपरी येथे 10 व 12 वीच्या विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शन शिबिर, सुशिक्षित बेरोजगार अभियान, डांगे चौक येथे महागाई विरोधात आंदोलन, तीनही विधानसभा मतदारसंघात रक्तदान शिबिर, 46 प्रभागांमध्ये डोळे तपासणी शिबर तसेच छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तीनही विधानसभा मतदारसंघात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. तसेच दि. 9 जून ते 23 जून या कालावधीत सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आल्याची माहिती अजित गव्हाणे यांनी यावेळी दिली.
मुंबई –
लोकांचा ऑनलाइन तपास घेणे ही आजकाल मोठी गोष्ट नाही. मार्केटमध्ये असे अनेक ऍप्स आहेत ज्यांच्या मदतीने लोक त्यांच्या परवानगीने एकमेकांना ट्रॅक करत आहेत, परंतु तुमच्यापैकी बरेच लोक असतील ज्यांचे मित्र तक्रार करतात की तुमचा नंबर नेहमी व्यस्त असतो. कॉल कधीच होत नाही. आज आम्ही तुम्हाला 3 USSD कोड सांगत आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही जाणून घेऊ शकता की तुमचा फोन ट्रॅक तर होत नाही ना ?
कोड *#21#
तुमच्या अँड्रॉइड फोनमध्ये हा कोड डायल करून, तुमचे मेसेज, कॉल किंवा इतर कोणताही डेटा इतरत्र वळवला जात आहे की नाही हे तुम्ही जाणून घेऊ शकता. जर तुमचे कॉल कुठेतरी वळवले जात असतील तर या कोडच्या मदतीने तुम्हाला नंबरसह संपूर्ण तपशील मिळतील. तुमचा कॉल कोणत्या नंबरवर डायव्हर्ट झाला आहे हे देखील कळेल.
कोड *#62#
कधीकधी तुमचा नंबर ‘नो-सर्व्हिस’ किंवा ‘नो-आन्सर’ म्हणतो. अशा परिस्थितीत तुम्ही हा कोड तुमच्या फोनमध्ये डायल करू शकता. या कोडच्या मदतीने तुमचा फोन दुसऱ्या नंबरवर रिडायरेक्ट झाला आहे की नाही हे तुम्ही जाणून घेऊ शकता. काहीवेळा तुमचा नंबर ऑपरेटरच्या नंबरवर रिडायरेक्ट केला जातो.
कोड ##002#
हा अँड्रॉइड फोनसाठी एक कोड आहे ज्याच्या मदतीने तुम्ही कोणत्याही फोनवरील सर्व फॉरवर्डिंग बंद करू शकता. तुमचा कॉल डायव्हर्ट होत आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हा कोड डायल करू शकता.