राजगुरूनगर –
ख्वॉजा मोईनुद्दीन चिश्ती-अजमेर यांच्या उरुसानिमित्त राजगुरुनगर येथे नातख्वॉनी (सामूहिक प्रार्थना) कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे तर विजेत्या विद्याथ्यार्थ्यांना ‘सॅक’चे वाटप करण्यात आले तसेच त्यांचा सत्कारही करण्यात आला.
यावेळी मौलाना मंझूर आलम, मौलाना मुस्तकीम रझवी, मौलाना मंजर इरशाद, मौलाना रझा आलम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन इख्लास युवा मंच, अहले वल सुन्नत जमात राजगुरुनगर आणि इख्लास महिला बचत गट यांनी केले होते.
कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक दादामिया शेख, माजी नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, नगरसेवक सुरेश कौदरे, रफीक मोमीन, समीर सातकर, लायन्स क्लबचे अध्यक्ष मिलिंद आहेर, सचिन सावंत, राहुल पिंगळे मोहसिन अत्तार, ट्रस्टी समीर मोमिन, नौशाद तंबोली, सलीम मोमिन, राजू मोमिन आदी उपस्थित होते.
यावेळी इम्रान मोमीन यांना वकील पदवी, तर हुजेफा मोमीन यांनी सीए परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास आलेल्या शालेय विद्यार्थ्यांना सॅकसह शैक्षणिक साहित्य भेट म्हणून देण्यात आले.
पिंपरी –
पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ नगरसेवक अजित गव्हाणे यांची आज (शनिवारी) नियुक्ती करण्यात आली आहे. तर, युवक शहराध्यक्षपदी इम्रान शेख आणि महिला शहराध्यक्षपदी प्रा. कविता आल्हाट यांना संधी देण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडी करण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या नियुक्त्या केल्या आहेत. दरम्यान, तीनही विधानसभानिहाय कार्याध्यक्ष नेमण्यात आले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसने संघटनेत फेरबदल करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार शहराध्यक्षपदाच्या दोन टर्म पूर्ण झालेल्या संजोग वाघेरे यांच्याजागी अजितगव्हाणे यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने अजित गव्हाणे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. शहराध्यक्ष अजित गव्हाणे उच्च शिक्षित, शांत, संयमी, मितभाषी आहेत. त्यांची नगरसेवकपदाची चौथी टर्म आहे. त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपदही भूषविले आहे. शहराच्या राजकारणाची त्यांना संपूर्ण जाण आहे.
जगदीश शेट्टी, प्रशांत शितोळे, राहुल भोसले कार्याध्यक्ष
पिंपरी-चिंचवड शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघानिहाय कार्याध्यक्ष नेमण्यात आले आहेत. पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी माजी नगरसेवक जगदीश शेट्टी, चिंचवड विधानसभेसाठी माजी नगरसेवक प्रशांत शितोळे आणि भोसरी मतदारसंघाचे कार्याध्यक्ष म्हणून नेहरूनगर येथील नगरसेवक राहुल भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
युवकच्या कार्याध्यक्षपदी पिंपरी मतदारसंघातून लिंकरोड येथील निलेश निकाळजे, चिंचवड मतदारसंघातील प्रसन्न डांगे आणि भोसरीतील योगेश गवळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महिला कार्याध्यक्षपदी चिंचवड मधील ज्योती गोफणे, काळभोरनगर येथील सविता धुमाळ आणि सांगवीतील उज्जवला ढोरे यांची निवड करण्यात आली.
पुणे –
आज एक हृद्य सोहळा ‘याची देही,याची डोळा’ पाहण्याचे भाग्य पुणे महानगरपालिकेच्या वास्तूला मिळाला ! ज्या पायरीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की झाली, त्याच पायरीवर ढोलताशांच्या दणदणाटात त्यांचे जंगी स्वागत आणि सत्कार करून पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांनी जणू शिवसेनेचा ‘हिसाब बराबर’ केला ! यावेळी भाजपाचे सभागृह नेते गणेश बिडकर आणि नगरसेवक उपस्थित होते. यावेळी पालिकेबाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
किरीट सोमय्या यांनी यावेळी केलेल्या छोटेखानी भाषणात महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, ‘ठाकरे सरकारने पुण्याच्या लोकांच्या जीवाशी खेळ केला. पुण्यातील कोविड सेंटरचा ठेका मिळालेल्या कंपनीचा मालक चहावाला आहे. तसेच हा चहावाला केईएम रुग्णालयामागे असतो. संजय राऊत यांची ही बेनामी कंपनी आहे. पुणे महापालिकेने त्या कंपनीला ब्लॅकलिस्ट केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेत चार कंत्राटे दिली.’
याआधी काय घडलं होतं?
किरीट सोमय्या शनिवारी (५ फेब्रुवारी) आधी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गेले. तिथे त्यांनी पुणे जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली. यानंतर सोमय्या तेथून पुणे महानगरपालिकेत आयुक्तांना भेटण्यासाठी आले. त्यावेळी शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांना निवेदन स्विकारण्याची मागणी केली. मात्र, सोमय्यांनी हे निवेदन स्विकारलं नाही. यावर आक्रमक शिवसेना कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. शिवसेना कार्यकर्त्यांनी हल्ला केल्यानंतर पोलिसांनी किरीट सोमय्यांना घटनास्थळावरून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसैनिकांच्या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या पायऱ्यांवर पडले. यानंतर पोलिसांनी सोमय्या यांना तिथून बाजूला नेत गाडीत बसवले. पोलिसांनी किरीट सोमय्या यांना गाडीत बसवल्यानंतरही आक्रमक शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवरही हल्ला चढवला. काही कार्यकर्ते गाडीच्या समोर आले, तर काही कार्यकर्त्यांनी गाडीच्या मागच्या बाजूने हल्ला केला होता.
पिंपरी –
प्रभाग रचना बदलल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यमान नागरसेवकांपासून नव्या इच्छुकांपर्यंत प्रत्यक्षात नागरिकांपर्यंत पोहोचणे म्हणजे मोठे आव्हान झाले आहे. संक्रांतीनंतर हळदी कुंकवाच्या कार्यक्रमांचा धडाका सुरू झाला असून विविध प्रकारच्या भेटवस्तूंची वाटप करून महिला मतदारांना आकर्षित करण्याची चढाओढ दिसून येत आहे. विशेषतः गावठाण भागात राजकीय हळदी-कुंकू जोमाने सुरू असल्याचे चित्र आहे.
मोशी, जाधववाडी- चिखली परिसरात सध्या हळदी कुंकवाचे कार्यक्रम जोरात सुरू आहेत. या कार्यक्रमांच्या माध्यमातून साड्यांसह विविध आकर्षक भेटवस्तू दिल्या जात असल्याने महिलांमध्ये मात्र आनंदाचे वातावरण आहे. निवडणुकीला आणखी कालावधी असला तरी प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष भेटीवर इच्छुकांसह विद्यमान नगरसेवकांनी जोर दिल्यामुळे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाची जाहिरातबाजीही जोरात सुरू आहे. अनेक इच्छुकांनी प्रभागरचना अंतिम होण्यापूर्वीच कंबर कसली असून नागरिकांच्या मनापर्यंत व घरापर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नासाठी कुटुंबातील मतदारसंख्या नावे व दूरध्वनी क्रमांकांची नोंदणीही या कार्यक्रमाच्या माध्यमातून चालविली जात आहे. संक्रांत आणि हळदी कुंकवाचा सण खरेतर महिलांचा सण म्हणून ओळखला जातो. मात्र नवखे इच्छुक पुरुष उमेदवार आपल्या सौभाग्यवतींना पुढे करून हा कार्यक्रम करत असले तरी आपली छबी निर्माण व्हावी, ओळख व्हावी म्हणून कार्यक्रमांमध्ये इच्छुकांचाही वावर चांगल्या प्रमाणात पहावयास मिळत आहे.
फलकांची चर्चा
सध्या विविध प्रभागात इच्छुकांचा उत्साह शिगेला पोहोचला असून ‘भावी नगरसेवक’, ‘समाजसेवक’, ‘विकासाचा चेहरा’ यासारख्या अनेक बिरुदावल्या इच्छुकांच्या नावाच्या अगोदर लागू लागल्याने प्रभागात लावल्या जाणाऱ्या फलकांचीही चांगलीच चर्चा सुरू आहे. हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा महिलांसाठी आयोजित करून सण-उत्सवाची जपणूक करत असल्याचा आव आणला जात असला तरी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महिलांच्या मतांचा जोगवा आपल्याच झोळीत पडावा यासाठीच ही धडपड असल्याचे दिसून येत आहे.
प्रभागरचनेतील बदल काहींच्या पथ्यावर तर काहींची गोची
सन 2017 साली झालेली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी चार सदस्यांची प्रभाग रचना होती. तर आता 2022 सालच्या महापालिका निवडणुकीसाठी 3 सदस्यांचा प्रभाग असणार आहे. त्यामुळे 2017 सालच्या प्रभाग रचनेत मोठा फेरबदल झाला आहे. गतवेळची प्रभागरचना ग्राह्य धरून ज्या इच्छुकांनी गेल्या वर्षभरापासून तयारी चालविली होती. त्यावर पूर्णत: पाणी फेरले गेल्याने नव इच्छुकांची मोठी धांदल उडाली आहे. तयारी केलेला बहुतांश भाग दसऱ्याच प्रभागाला जोडला गेल्याने वर्षभराची मेहनत आणि अर्थकारण वाया गेले आहे. त्यातच निवडणुकीला आता दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिल्याने एवढ्या कमी वेळेत सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेकांनी जोरदार तयारी चालविली आहे.