मुंबई –
मुंबईतील रस्त्यांवर आता लवकरच सफाई कामगारांना पर्याय म्हणून यांत्रिकी झाडू दिसणार आहेत. मुंबईतील 150 किलोमीटर लांबीच्या मुख्य रस्त्यांची झाडलोट आता यांत्रिकी पद्धतीने केली जाणार आहे. त्यासाठी मुंबई महापालिका तीन कंत्राटदार नियुक्त करणार आहे.
पूर्व उपनगर, पश्चिम उपनगर आणि शहर अशा तीन विभागांनुसार कंत्राटदार नियुक्तीसाठी टेंडर मागविण्यात आली आहेत. तर, महापालिकेच्या ताफ्यातील यांत्रिकी झाडूंच्या सहाय्याने 28 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची झाडलोट होणार आहे.
मुंबईतील रस्त्यांची दैनंदिन झाडलोट आतापर्यंत सफाई कामगार करीत होते. काही मोजक्याच रस्त्यांसाठी यांत्रिकी झाडूचा वापर केला जातो. काही वर्षांपूर्वी महापालिकेने रस्त्यांवर यांत्रिकी झाडू वापरण्याचा प्रयोग केला होता. मात्र, त्यात फारसे यश आले नाही तसेच या यांत्रिकीकरणाला विरोधही झाला. त्यानंतर आता पुन्हा महापालिकेने मुंबईतील 150 किलोमीटर लांबीच्या 80 हून अधिक रस्त्यांची झाडालोट यांत्रिकी पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्व उपनगर, पश्चिम उपनगर आणि शहर अशा तीन विभागांनुसार कंत्राटदार नियुक्तीसाठी टेंडर मागविण्यात आली आहेत.