पिंपरी-
पिंपरी चिंचवडचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आज (गुरूवारी, दि.21) पदभार स्विकारला. अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे यांच्याकडून त्यांनी पदभार स्विकारला. बुधवारी उशीरा रात्री राज्याच्या गृहविभागामार्फत बदलीचे आदेश निघाले. त्यानंतर लगेचच दुस-या दिवशी अंकुश शिंदे यांनी आयुक्तालयात हजेरी लावत पदभार स्विकारला आहे. आयुक्त कृष्ण प्रकार हे परदेशी असल्याने शिंदे यांनी अप्पर आयुक्त संजय शिंदे यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. संजय शिंदे यांनी अंकुश शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची व्हि.आय.पी सुरक्षा, विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून मुबईत तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. अंकुश शिंदे यांनी यापूर्वी गडचिरोली, सोलापूर, मुंबई येथे काम केले आहे. सोलापूरमध्ये ते कार्यरत असताना तेथील अनेक नगरसेवकांवर त्यांनी पोलीस कारवाई केली होती, त्यामुळे ते चर्चेत आले. मीडियाला दूर ठेवून स्वतःच्या कार्यावर लक्ष केंद्रीत करणारे अशी त्यांची ख्याती आहे. त्यांच्यापुढे आता पिंपरी-चिंचवडमधील वाढती गुन्हेगारी रोखण्याचे प्रमुख आव्हान असेल. कृष्ण प्रकाश यांची अचानक बदली झाल्याने अनेक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.