मुंबई –
राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून आरोप-प्रत्यारोपांचा गोंगाट सुरू असताना जो तो आपापली मते हिरीरीने मांडताना दिसत आहे. मग यामध्ये वादग्रस्त विधानांमध्ये भाग घेऊन लाइमलाईट खेचणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस तरी मागे कशा राहतील? त्यांनी ही ट्विटरवर ‘टिवटिवत’ ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये ११ हजारांहून अधिक धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आलेत तर ३५ हजारांहून अधिक ठिकाणी भोंग्यांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्याचं निश्चित करण्यात आलंय. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचं अभिनंदन केलंय. मात्र उत्तर प्रदेशमधील या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आता राज्यात पुन्हा एकदा सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा संघर्ष दिसून येण्यास सुरुवात झालीय. त्यातच आता या वादात अमृता फडणवीस यांनी उडी घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षरित्या टीका केलीय.
राज ठाकरे यांनी राज्यातील सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना राज्यातील राज्यकर्ते हे भोगी असल्याचा टोला लगावला आहे. याच टीकेचा आधार घेत अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरुन राज्यातील महाविकास आघाडी सरकारला आणि अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. “ऐ ‘भोगी’ काहीतरी शिक आमच्या ‘योगीं’कडून”, असं ट्विट अमृता यांनी केलंय. यामध्ये त्यांनी महाराष्ट्र हा हॅशटॅग वापरला आहे.