पिंपरी –
पिंपरी-चिंचवडमधील तृतीय पंथियांना नोकरी देण्याचे व ज्येष्ठ तृतीय पंथियांना पेन्शन देण्याचे महापालिकेने ठरवले आहे असे आयुक्त राजेश पाटील यांनी जाहीर केले आहे. तसे झाले तर तृतीय पंथियांना नोकऱ्या देणारी देशातील ही पहिलीच महानगरपालिका ठरेल. पिंपरी चिंचवड महापालिकेनं सामाजिक क्रांतीचं पाऊल उचललं आहे.
तृतीयपंथीय घटक हा बऱ्यापैकी समाजावर अवलंबून असतो. अशावेळी समाजानं त्यांच्या संवेदना जाणून घेतल्या पाहिजेत. आपलं कर्तव्य समजून प्रत्येकानं उपेक्षित आणि दुर्लक्षित राहिलेल्या घटकांसाठी सामाजिक जाणिवेतून काम केलं पाहिजे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेनं या कल्याणकारी कामासाठी पुढाकार घेतला आहे. महापालिकेनं या समूहाला मुख्य प्रवाहात आणून स्वावलंबी बनवण्यासाठी विविध उपक्रम आणि योजना हाती घेतल्या आहेत. तृतीयपंथीयांना उतारवयात बऱ्याचदा हलाखीचं जीवन जगावं लागतं. अशावेळी त्यांना आर्थिकदृष्टया मदत करून त्यांचं जीवन सुसह्य करण्यासाठी महापालिकेने महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे.
वयाची ५० वर्षे पूर्ण केलेल्या आणि पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील रहिवासी असणाऱ्या तृतीयपंथी व्यक्तींना आर्थिक मदत म्हणून दरमहा ३ हजार रुपये पेंशन स्वरुपात देण्यात येणार आहे. समाजातील सर्व घटकांच्या सर्वांगीण उत्थानासाठी त्यांच्या जीवनामानावर सकारात्मक परिणाम करणारी ही तृतीयपंथी पेंशन योजना असल्याचं मत आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी व्यक्त केलं.
याशिवाय महापालिका ग्रीन मार्शल पथकामध्ये तृतीयपंथीयांची नेमणूक देखील करणार आहे. तसेच त्यांना महापालिकेच्या विविध उद्यानांमध्ये सुरक्षा रक्षकाची जबाबदारी दिली जाणार आहे. याशिवाय महापालिका हद्दीतील तृतीयपंथीयांच्या बचत गटांना व्यवस्थापन आणि बळकटीकरणासाठी अर्थसहाय्य देण्याची योजना देखील आता नव्याने सुरू करण्यात आली आहे.