पुणे –
गुरुवारी सकाळी यमुना एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात होऊन पाच जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी चौघेजण पुण्यातील बारामतीचे आहेत. तर एक कर्नाटकचा आहे. मृतांमध्ये चार महिला आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनाने ट्रकला धडक दिल्यानंतर हा अपघात झाला. या अपघातानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालक मंत्री अजित पवार यांच्या कार्यालयामधून तातडीने या अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी हालचाली सुरु केल्या.
अपघाताचे वृत्त समजताच राज्याचे उपमुख्यमंञी अजित पवार यांच्या मुंबई कार्यालयाकडून अपघाताची माहिती घेतली जात आहे. तसेच अपघातग्रस्त जखमींना आवश्यक ती मदत दिली जात आहे. नोएडा येथे महाराष्ट्र राज्यातील पोलीस अधिकारी बोराटे हे आवश्यक मदत व माहिती अपघातग्रस्त व्यक्तींना पुरवित आहेत. कर्नाटक राज्यातील एक व महाराष्ट्र राज्यातील बारामतीमधील चार असे एकुण पाच व्यक्तीचा या अपघातात दुदैवी मृत्यु झाल्याचे वृत्त समजताच सकाळपासूनच बारामती शहरावर शोककळा पसरली आहे.
पहाटे ५ वाजता जेवर टोलनाक्यापासून ४० किमी अंतरावर हा अपघात झाला. अपघातानंतर सर्वांना जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आलं होतं. यावेळी पाच जणांना मृत घोषित करण्यात आलं तर दोघांवर कैलाश रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दिल्लीवरुन नोएडामार्गे चारधाम देवदर्शनच्या यात्रेसाठी जाणाऱ्या बोलोरो जीप व डंपर ट्रक अपघातात महाराष्ट्र राज्यातील बारामतीमधील चार व कर्नाटक राज्यातील नवंजळ येथील एक अश्या पाच व्यक्तींचा मृत्यु झालाय. चंद्रकांत बोराटे त्यांची पत्नी सुवर्णा बोराटे यांच्याबरोबरच रंजना पवार आणि मालन कुंभार अशी मरण पावलेल्यांची नावं आहेत. यमुना एक्सप्रेसवर झालेल्या अपघातात गाडी मालक नारायण कोळेकर हे पण अपघातात जखमी झाले आहेत. कर्नाटक राज्यातील नवांजाळमधील एका व्यक्तीचाही यात मृत्यु झाला असून मयत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.