पिंपरी –
चिंचवड वाल्हेकरवाडी येथील बहुजन संघर्ष प्रतिष्ठानच्या १० व्या भीम महोत्सवाचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. या महोत्सवांतर्गत गायक चंद्रकांत शिंदे आणि संकल्प गोळे यांनी भीम गीतांबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज, थोर समाज क्रांतिकारक महात्मा जोतीराव फुले, माता जिजाऊ, माता रमाई, भगवान गौतम बुद्ध, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्यावर रचलेली गीते सादर केली.
यावेळी सादर करण्यात आलेल्या ‘भारत देशाचा सात बारा माझ्या भिमाच्या नावावर’, ‘माझ्या भिमाचं नाव आहे इंटरनॅशनल एअरपोर्टला’, ‘जावई जय भीम वाला’, ‘शिवबा सोळाव्या वर्षात लढला वाघावानी तो वैऱ्याला भिडला’, ‘कट्टर जय भीम वाला नही झुकेगा साला’, अशी अनेक लोकप्रिय भीमगीतांना आंबेडकरी जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. “मला आमदार झाल्यासारख वाटतय” फेम संकल्प गोळे यांनी ही गीते सादर केली. तसेच ख्यातनाम गायक चंद्रकांत प्रल्हाद शिंदे यांनी “जरी संकटाची काळरात्र होती; भिमाच्या लेखणीची धार; लाल दिव्याच्या गाडीला” अशी भीमगीते सादर केली.
यावेळी उपस्थितांचे स्वागत बहुजन संघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष मनोज तोरडमल यांनी केले. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, तसेच माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, माजी नगरसेवक बाबू नायर, मोरेश्वर शेडगे, शाम वाल्हेकर, तसेच बिभीषण चौधरी, भाजपा शहर उपाध्यक्ष आदेश नवले, बहुजन संघर्ष प्रतिष्ठान उपाध्यक्ष शेषराव लोंढे, कार्याध्यक्ष बुद्धीसागर आठवले, खजिनदार दादा गणगे, सदस्य दीपक तोरडमल, महावीर जगताप, सुधाकर सरेकर, उत्तेश्वर पानके, स्वप्निल बनसोडे, अंकूश तेलंग आदींसह हजारो अनुयायी उपस्थित होते.