पुणे –
येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी सुरू झाली आहे. या निवडणुकांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. आगामी महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायत या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस एकूण जागांपैकी २७ टक्के जागांवर इतर मागासवर्गीय प्रवर्गातील म्हणजेच ओबीसी व्यक्तींना उमेदवारी देणार असल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले.
केवळ राष्ट्रवादीच नाही तर सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीत ओबीसी समाजातील व्यक्तींना पूर्वीच्या प्रमाणात स्वतःहुन किमान २७ टक्के जागांवर उमेदवारी दिली पाहिजे. यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीसाठी रद्द झालेल्या ओबीसी आरक्षणाची कसर भरून निघू शकेल,अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली.
महाविकास आघाडी सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न केले. यासाठी खास कायदा तयार केला. पण सर्वोच्च न्यायालयाने या सर्वांना स्थगिती दिली आहे.