पिंपरी –
या वर्षी 1 आठवडा अगोदरच मान्सून महाराष्ट्रात येण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. पण अगोदर सोडाच वेळेवरही आलेला नाही. वास्तविक देशात मान्सूनने एक आठवडा अगोदरच पदार्पण केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही तो 1 जूनला दाखल होईल असे मानले जात होते. सर्वसाधारणपणे महाराष्ट्रात 7 जूनला मान्सून येतो. उकाड्याने लोक हैराण झाले आहेत. लोक चातकासारखी पावसाची वाट पाहत आहेत. शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. प्रत्येक वेळी मान्सून येण्याची नवीन तारीख जाहीर होत आहे. आता 12 किंवा 13 जूनला मान्सून येण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
मात्र कर्नाटकात दाखल झालेला पाऊस गेल्या काही दिवसांपासून कारवार, चिकमंगळूर या कर्नाटक-गोवा सीमाभागातच थांबलेला दिसत आहे. मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण मिळाल्यास 12 ते 13 जूनच्या आसपास मान्सून राज्यात येण्याची शक्यता आहे.
सध्या कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागांत ढगाळ वातावरण असल्याने गरमीने प्रमाण वाढले आहे. तर विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. काही भागांत पुढील दोन-तीन दिवसांत मान्सूनपूर्व सरींचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात मात्र अद्यापही उष्णतेची लाट जाणवत आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या महाराष्ट्रातील प्रवेशाला सध्या अडथळा निर्माण झाला आहे.
आता मान्सून गोव्याच्या सीमेवर रेंगाळला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आगमनासाठी आता नवा मुहुर्त देण्यात आला आहे. मान्सून राज्यात आता तो 12 ते 13 जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज आहे. यापूर्वी तो 7 जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं दिला होता.