मुंबई –
भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे जगभरात संतापाची लाट उसळली आहे. या वक्तव्याप्रकरणी भारत सरकारने जगभरातील मुस्लिम समाजाची माफी मागावी या मागणीसाठी हॅकर्सनी ठाणे पोलिसांची वेबसाईट हॅक केली आहे. दरम्यान अल-कायदा या दहशतवादी संघटनेनंही भारतातील वेगवेगळ्या शहरांवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे.
आता देशातील वेगवेगळ्या सरकारी आणि खासगी वेबसाईट्सवर याच मुद्द्यावरुन सायबर हल्ले होताना दिसतायत. याचा सर्वात मोठा फटका महाराष्ट्राला बसला असून राज्यातील 50 वेबसाईट्स हॅक झाल्यात. या हॅकर्सने जगभरातील मुस्लीम हॅकर्सला भारतीय वेबसाईटवर सायबर हल्ले करण्यासाठी आवाहनही केलं आहे. याच पार्श्वभूमीवर आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काहींचा समाजात तेढ पसरवण्याचा प्रयत्न सुरु असून या प्रकरणातील कारवाईबाबत पंतप्रधानांनी निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे. आज ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले की, “अनेक वेबसाईट हॅक करण्यात आल्या ही वस्तुस्थिती आहे. एडीजी मधुकर पांडे पुढील तपास करत आहे. ठाणे पोलीस कमिशनची वेबसाईट हॅक झाली आहे, परंतु कोणताही महत्त्वाची माहिती लीक झालेली नाही. कोणत्याही कारणावरून समाज- समाजात एक प्रकारे तेढ निर्माण करण्याचे जे काम सुरु आहे त्याचे हे परिणाम आहेत. हॅकर्सनी जगभरातील सर्व हॅकर्सना विनंती केली आहे की, तुम्हीही यात सहभागी व्हा. राज्य सरकारच्या वतीने या सर्व गोष्टींचा आढावा घेण्यात आला आहे. त्यावर काय उपाय योजना करायच्या आहेत त्यासंदर्भातही यंत्रणा कार्यरत आहेत. तथापी सर्व माहिती अद्याप प्राप्त झाली नसल्याने त्यामध्ये अधिक माहिती देण्यासाठी माझ्याकडे आता नाही.”
“हॅकर्सची जी मागणी आहे की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या संदर्भात माफी मागितली पाहिजे. ज्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी जे प्रेषित पैगंबर मोहम्मदांबद्दल उद्गार काढले त्याबद्दल अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत कारवाई सुरु आहे. त्याबाबत काय निर्णय घ्यायचा याबाबत पंतप्रधानांनी स्वत: ठरवले पाहिजे,” अशी मागणीही गृहमंत्र्यांनी केली आहे.
“ही घटना दुर्दैवी आहे. कारण आपल्या देशात समाजा-समाजात द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे, त्याला प्रतिकार म्हणून प्रतिहल्ला म्हणून अशाप्रकारची कृती समाजातल्या टोकाच्या विचार करणाऱ्या लोकांकडून होत आहे. ही बाब बरोबर नाही कारण शेवटी सगळ्यांना सलोख्याने राहायचे असेल तर अडचणी भावना समजून घेणे गरजेचे आहे. हॅकर्सकडून जे अपील केले जात आहे ज्यामुळे नुकसान सर्वांचे होणार आहे. त्यामुळे अशा गोष्टींपासून सर्वांनी दूर रहावं” अशी विनंती गृहमंत्र्यांनी केली आहे.