चिखली, मोशी येथील इंद्रायणी नदी काठचा परिसर झाला प्लॅस्टिक मुक्त
पिंपरी –
महापालिकेच्या वतीने प्लास्टिक मुक्ती अभियाना अंतर्गत क क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रातील चिखली व मोशी येथील इंद्रायणी नदीच्या परिसरात आयोजित “रिव्हर प्लोगेथॉन” मोहीम मध्ये सुमारे चारशे पन्नास शालेय विद्यार्थी, शिक्षक, सोसायटी फेडरेशनचे पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक यांनी सहभाग घेऊन जवळपास 3 टन कचरा संकलित केला.
चिखली येथील भैरवनाथ मंदिर परिसर लगत असणाऱ्या इंद्रायणी नदीचा किनारा व परिसरात प्लास्टिक मुक्ती अंतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच प्लास्टिक वापरणार नसल्याबाबत व पर्यावरण संवर्धनासाठी शपथ घेतली. माजी महापौर राहुल जाधव, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, गणेश मोरे, बी. बी. कांबळे, वैभव कांचन गौडार व नागरिक सहभागी झाले होते.
तसेच मोशी येथील रिव्हर रेसिडेन्सी सोसायटी लगत असणाऱ्या नदी किनाराच्या परिसरातही प्लोगेथोन मोहीम राबविण्यात आली. यामध्ये माजी महापौर राहुल जाधव, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, चिखली सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगडे, दिनेश यादव, एस.एन.बी.पी. शाळेचे सुमारे 300 विद्यार्थी, सिटी प्राइड शाळेचे सुमारे 25 शिक्षक, श्रीमती भाल्ला, सूजा राजेश व मोशी परिसरातील विविध सोसायटीचे सभासद, ज्येष्ठ नागरिक, महापालिका अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते.
यावेळी प्लास्टिक मुक्त अभियानाची नागरिकांमध्ये जनजागृती करण्याकरिता ३०० शालेय विद्यार्थ्यांसोबत रॅली काढण्यात आली.
‘प्रश्न सोडविण्याची धमक फक्त राष्ट्रवादीत’
‘१०० नगरसेवक निवडून द्या; शहरात दररोज पाणीपुरवठा करू ‘
पिंपरी –
भाजपला पाच वर्षात आंद्रा, भामा-आसखेड धरणातून पिंपरी-चिंचवडकारांकरिता पाणी आणता आले नाही. ज्यांच्या अंगातच पाणी नाही ते काय रोज पाणी देणार आहेत ? मी शहरवासीयांना दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी राजकीय स्टंटबाजी करणार नाही. प्रश्न सोडविण्याची धमक, ताकद आमच्यात आहे. आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे १०० नगरसेवक निवडून द्या. शहरवासीयांना दररोज पिण्यासाठी पाणी देण्यासह सर्व प्रश्न मार्गी लावून दाखवतो, अशी हमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा आज चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात मेळावा झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. आमदार अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिलाध्यक्षा कविता आल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख, माजी महापौर संजोग वाघेरे, योगेश बहल, मंगला कदम, माजी नगरसेवक नाना काटे, भाऊसाहेब भोईर आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले की, मागील पाच वर्षात सत्ताधारी भाजपने कमिशन मिळणारी कामे केली. ज्यातून जास्त कमिशन मिळेल, ते काम करण्यात भाजपला रस होता. कुत्र्यांच्या नसबंदीत कमिशन मिळविले. साडेसहा कोटी रुपयांची कसली नसबंदी केली. ती ही लॉकडाऊनच्या कालावधीत, सोन्याचे उपकरण वापरले होते की काय नसबंदीत, असा सवालही त्यांनी केला. शहरात सध्या इव्हेंट सुरु झाले आहेत. जेसीबी, बोलोरो देत आहेत. यांचे काही खरे नाही. लबाडा घरचे अवतान आहे. जेवल्याशिवाय कळत नाही असे म्हणत भाजप आमदार महेश लांडगे यांनाही टोला लगाविला.
पिंपरी –
आगामी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 17 जूनपर्यंत प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यावर 17 जून ते 25 जूनपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. तर, 7 जुलैला अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध कराव्यात, असा आदेश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरूंदकर यांनी शुक्रवारी महापालिका आयुक्तांना दिला आहे.
5 जानेवारी 2022 ते 31 मे 2022 पर्यंत विधानसभेच्या मतदार यादीमध्ये समाविष्ट झालेल्या, वगळलेल्या अथवा दुरूस्त झालेले मतदार विचारात घेऊन प्रभागनिहाय मतदार यादी विभाजनाचे काम करावे लागणार आहे. ओबीसी आरक्षणामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर गेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला ज्या ठिकाणी पाऊस कमी तेथे निवडणुका घेण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार राज्यातील महापालिका निवडणूक प्रक्रिया सद्यस्थितीत वेगाने सुरू आहे. प्रभाग रचना, आरक्षण सोडत पूर्ण झाली आहे. आता आयोगाने मतदार याद्यांचाही कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे.
महापालिकेने 17 जूनपर्यंत प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करावी. 17 जून ते 25 जून या कालावधीत मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. 7 जुलै रोजी अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध कराव्यात. त्यानंतर याद्या महापालिका कार्यालयात, संकेतस्थळावर, प्रभाग समिती कार्यालयात प्रसिद्ध कराव्या, अशा सूचनाही आयोगाने दिल्या आहेत.
मुंबई –
राज्यात पुन्हा एकदा मास्क सक्ती करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणं बंधनकारक असेल. वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय. रेल्वे, बस, सिनेमागृह, सभागृह या ठिकाणी मास्क सक्ती करण्यात आली आहे. रुग्णालये, कॉलेज, शाळा या ठिकाणीही मास्क सक्ती असेल.
कुठे-कुठे मास्क बंधनकारक ?
1 सार्वजनिक वाहतुकीची ठिकाणं, 2 शाळा, 3. कॉलेज, 4. बंदीस्त सभागृह, 5. गर्दीची ठिकाणं, 6. रेल्वे, 7. बस, 8. सिनेमागृहे, 9. रुग्णालये, 10. हॉटेल.
मागच्या काही दिवसात राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनास्थिती पाहता खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय. कोरोना रुग्णांची संख्या जास्त वाढू नये, म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी या नियमांचं पालन करत सहकार्य करण्याचं आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आलं आहे.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांचा हल्लाबोल
पिंपरी, – गेली तीन वर्षे पवना धरण हे सातत्याने शंभर टक्के भरत असतानाही पिंपरी-चिंचवड शहरवासियांवर लादलेली कृत्रिम पाणीटंचाई हे भाजपचे पाप आहे. पाच वर्षांपूर्वी आंद्रा आणि भामा आसखेडचे पाणी मंजूर झाल्यानंतरही संपूर्ण सत्ताकाळात केवळ टक्केवारीच्या भ्रष्ट राजकारणामुळे शहरवासियांचे अत्यंत हाल झाल्याने त्याची परतफेड शहरातील जनता महापालिकेच्या निवडणुकीत नक्कीच करेल आणि भाजपला सत्तेतून बेदखल करेल, अशा शब्दात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
शहरातील नागरिकांवर पाणीटंचाई लादणाऱ्या आणि अडीच वर्षे महापालिकेत पक्षनेते असतानाही आंद्रा आणि भामा आसखेडचे पाणी शहरवासियांना मिळवून देण्यात अपयशी ठरलेल्या भाजपच्या एकनाथ पवार यांनी शहरातील पाणीटंचाईचे खापर प्रशासनावर फोडले आहे. त्याबाबत पवार यांनी केलेल्या आरोपांना अजित गव्हाणे यांनी उत्तर दिले असून गेल्या अडीच वर्षांत शहरवासियांनावर लादलेल्या कृत्रिम पाणीटंचाईवर भाजपवर हल्लाबोल केला आहे.
याबाबत गव्हाणे यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात म्हटले आहे की, भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्तीचा नारा देऊन सत्ता पदरात पाडून घेणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी गेल्या पाच वर्षांत शहरात भययुक्त आणि भ्रष्टाचारयुक्त सत्ताकारण केले. शहराचा पाणीप्रश्न कायमचा सोडविण्यासाठी पवना बंद पाईपलाईन ही योजना राष्ट्रवादीने राबविण्यास सुरुवात केली होती मात्र त्याला विरोध भाजपच्या नेत्यांनीच केल्याने ही योजना बंद पडली. यानंतर राष्ट्रवादीने आपल्या सत्तकाळात चोवीस तास पाणीपुरवठ्याचा पायलट प्रकल्प हाती घेतला होता. सन 2017 मध्ये सत्ता गेल्याने हा प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी भाजपाची असताना गेल्या पाच वर्षांत त्यांना हा प्रकल्प पूर्ण करता येऊ शकला नाही.
सुरुवातीच्या अडीच वर्षांत पक्षनेता असलेल्या एकनाथ पवार यांनी चोवीस तास पाणीपुरवठा योजनेची माहिती तारखेसह जनतेसमोर ठेवावी, असे आव्हानही गव्हाणे यांनी दिले आहे. गेल्या तीन वर्षांपासून शहरवासियांना एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. तीनही वर्षे पवना धरण शंभर टक्के भरलेले असतानाही भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी शहरात कृत्रिम पाणीटंचाई करून टॅकरलॉबीच्या माध्यमातून आपली घरे भरण्याचा प्रयत्न केला. स्वत:च्या स्वार्थासाठी शहरवासियांवर पाण्यासाठी भटकंती करायची वेळ आणली. अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी महापालिकेत प्रशासक आलेला असतानाही आपले पाप लपविण्यासाठी प्रशासकावर पाणीटंचाईचे खापर फोडणे हे हास्यास्पद असल्याचेही गव्हाणे यांनी म्हटले आहे.
गेल्या पाच वर्षांत ठेकेदारांना दमदाटी करणे, टक्केवारी लाटणे, खंडणीखोरी करणे, लाचखोरी करणे एवढेच धंदे भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी केल्याचे येथील जनतेने अनुभवले आहे. राष्ट्रवादीने आपल्या काळात केलेल्या विकासकामांचे श्रेय लाटण्याचा प्रकार एकनाथ पवारसारखे भाजपचे नेते करीत आहेत हे शहराचे दुर्देव आहे. गेल्या पाच वर्षांत शहरवासियांना पाण्याचे दुर्भिक्ष लादणाऱ्या व एकही आश्वासन पूर्ण न करणाऱ्या भाजपला येत्या महापालिका निवडणुकीत शहरातील सुजाण मतदार भाजपला धडा शिकवेल व शहराच्या वादळी विकासासाठी राष्ट्रवादीचे शंभरहून अधिक नगरसेवक महापालिका निवडणुकीत विजयी होतील, असा विश्वासही गव्हाणे यांनी व्यक्त केला आहे.