पिंपरी –
‘अच्छे दिन’च्या नावावरून जनतेला लुबाडणाऱ्या व महागाईचा भडका उठवणाऱ्या केंद्र सरकार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) महिला विभागाच्या वतीने जीवनावश्यक वस्तू महागाई व गॅस दरवाढी विरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक पिंपरी येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलांनी गॅस सिलेंडरची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली.
केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपा सरकारने भोळ्याभाबड्या जनतेचा केवळ छळ केला आहे. उज्वला गॅस योजनेच्या नावाखाली केवळ फसवणूक केली असून आज सिलेंडरचे भाव आकाशाला नेऊन ठेवले आहेत. याचबरोबर पेट्रोल, डिझेल, CNG यांचाही भाव आकाशाला नेऊन ठेवला आहेत. सामान्य माणसांनी जगावं तरी कसं? असा सवाल करीत आज सर्व महिला आघाडीने तीव्र निषेध नोंदवला आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा वैशालीताई नागवडे, पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) महिला अध्यक्षा कविताताई आल्हाट तसेच शहरातील प्रमुख नेते मंडळी उपस्थित होते.