पिंपरी –
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देहू येथे उद्या (14 जून) येत आहेत. संत तुकाराम महाराज शिळा मंदिर उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यांच्या या दौऱ्याला चक्क भाजप युवा मोर्चाचा विरोध असल्याचं समजतंय. पिंपरी-चिंचवड शहर भाजप युवा जनताचे उपाध्यक्ष सचिन काळभोर यांनी मोदींच्या कार्यक्रमाला विरोध दर्शवला आहे. त्यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे.
सचिन काळभोर यांच्या विरोधाबाबत त्यांनी सांगितले की, रेड झोन एरिया कमी करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू असून, आंदोलन व मोर्चे काढण्यात आले आहेत. देहू गाव, देहरोड, चिखली, तळवडे, मोशी, दिघी, निगडी, बोपखेल ह्या गावातील सर्व जमीन रेड झोन क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली आहे. संरक्षण क्षेत्रातील बाधित जागा म्हणून पुणे जिल्हाधिकारी यांनी जाहीर केली आहे. त्यामुळे बांधकाम परवाना मिळत नाही तसेच इतर मुलभूत सुविधा उपलब्ध होत नाहीत. गटारं, रस्ता, पाणी, लाईट इत्यादी सुविधा नागरिकांना उपलब्ध होत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेड झोन एरिया क्षेत्र कमी करून स्थानिक भूमी पुत्र यांना न्याय मिळवून द्यावा. त्यानंतरच संत तुकाराम महाराज शिळा मंदिर उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहावे अशी मागणी सचिन काळभोर यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमची मागणी मान्य न केल्यास त्यांच्या दौऱ्याच्या वेळेस रास्ता रोको करण्यात येईल तसेच काळे झेंडेही दाखवण्यात येणार आहेत असे सचिन काळभोर यांनी सांगितले.
आता सचिन काळभोर यांची भाजपा नेते समजूत काढणार की त्यांचे आदोलन मोडून काढणार हे पाहावे लागेल.